आष्टी, दि. — शहरासह तालुक्यात भारत गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने ग्राहकांना ५० ते ६० दिवस प्रतीक्षा करावी लागत असून, गृहिणींसमोर स्वयंपाकाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
आष्टी तालुक्यात भारत गॅसची एकच एजन्सी असल्याने सर्व ग्राहक त्यावरच अवलंबून आहेत. मात्र, कंपनीकडूनच सिलेंडरचा पुरवठा होत नसल्याचे कारण एजन्सीधारकांकडून सांगितले जात आहे. अनेक ग्राहकांनी ३५ दिवसांपूर्वी बुकिंग करूनही त्यांना अद्याप सिलेंडर मिळालेला नाही. “गाडी आली नाही” असे सांगून ग्राहकांना परत पाठवले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तहसीलदारांकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तक्रारीसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
दरम्यान, तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी श्रीमती वरठी यांनी सांगितले की, एजन्सीकडून कंपनीकडे पुरवठा होत नसल्याची तक्रार प्राप्त झाली असून, संबंधित कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच यावर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
एजन्सीशी संबंधित प्रतीक दाभे यांनीही “कंपनीकडून पुरवठा कमी झाल्याने ग्राहकांना वेळेत सिलेंडर देणे कठीण होत आहे. नवीन बुकिंग निकषांमुळे विलंब वाढत आहे,” असे स्पष्ट केले.
एकूणच, जीवनावश्यक असलेल्या गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे नागरिक त्रस्त असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पुरवठा सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे.




