हिंगणघाटच्या मातीतून उगवलेला शब्दांचा तारा;शायर प्रणय सतलज यांनी महाराष्ट्रात आंबेडकरी गीतांना दिली नवी ओळख
संघर्षातून “भीम स्टार” पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
महाराष्ट्र दणका टीम
नागपूर : विदर्भाच्या कृषीभूमीत वसलेल्या हिंगणघाट या शहराने महाराष्ट्राला अनेक दिग्गज कलावंत दिले. याच मातीतून उगवलेले एक तेजस्वी नाव म्हणजे बहुप्रतिभावान शायर प्रणय सतलज. आज त्यांच्या लेखणीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आंबेडकरी गीतांना नवी दिशा, नवा आवाज आणि नवा आत्मविश्वास दिला आहे.
प्रणय सतलज यांचे मूळ नाव प्रणय चरणदास खोब्रागडे. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या प्रणय यांच्या आयुष्यात संघर्ष हा कायमच सोबतीला होता. वडील चरणदास खोब्रागडे हे शिक्षक असल्याने घरात शिक्षणासोबत संस्कारांचीही शिदोरी मिळाली. लहानपणापासूनच शब्दांवर प्रेम करणाऱ्या प्रणय यांना शायरीची प्रचंड ओढ होती. त्यांच्या आयुष्याला पहिली दिशा मिळाली ती प्रसिद्ध प्रवचनकार सरवर जानी यांच्या सहवासातून. त्यांनीच प्रणय यांच्या लेखणीला शब्दांचा पहिला स्पर्श दिला आणि एका नव्या शायरचा जन्म झाला.
नागपूर येथे शिक्षणासाठी गेल्यानंतर प्रणय यांचा परिचय आंबेडकरी साहित्य आणि चळवळीशी झाला. प्रकाशराय पाटणकर यांच्या सहवासात राहून त्यांनी समाजभान जपणारी गीते लिहायला सुरुवात केली. संघर्ष, वेदना, स्वाभिमान आणि परिवर्तन यांचा आवाज त्यांच्या गीतांतून उमटू लागला. एका कट चहावर अनेक रात्री जागवत त्यांनी शब्दांची साधना केली आणि आपल्या कष्टाच्या बळावर मुंबईसारख्या मायानगरीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
प्रणय सतलज यांनी केवळ स्वतःचे नाव मोठे केले नाही, तर महाराष्ट्रातील अनेक नवोदित कलाकारांनाही व्यासपीठ मिळवून दिले. “मोठ्यांना मोठे करणे सोपे असते, पण गरीब आणि लहान कलाकारांना कोण मोठं करणार?” हा विचार मनात ठेवून त्यांनी अनेक नव्या कलाकारांना घडवले. आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत त्यांच्यामुळे अनेक कलाकार ओळखले जात आहेत.
महानायक आनंद शिंदे यांनी गायलेले “बोले रमाईचा हुमने भीमराव” हे गीत आजही लाखो लोकांच्या काळजाला भिडते. आदर्श शिंदे यांनी गायलेले “विशाल मावत नाही नोटा”, डॉ. उत्कर्ष शिंदे यांचे “जीवाला जात नाही”, आलोक शिंदे यांचे “पुस्तक भीमाचं रमाईचं” आणि राहुल शिंदे यांचे “अस्तित्व काय आहे” या गीतांनी सामाजिक जाणीव अधिक तीव्र केली. प्रणय यांच्या शब्दांत वेदना आहे, बंड आहे, पण त्याचसोबत आशेचा प्रकाशही आहे.
आयकॉनिक स्टार राहुल साठे आणि सागर साठे यांच्या संगीताने प्रणय यांच्या गीतांना नवा आयाम मिळाला. “भीम नगर”, “वसंत चेपे” यांसारख्या दमदार गीतांनी महाराष्ट्र भारावून गेला. “भीमाला चॅलेंज नाही” आणि “भीमानं दिल्या” यांसारख्या गीतांच्या भव्य चित्रिकरणाने भीमगीतांना आधुनिक रूप मिळाले.
मुंबईत त्यांच्या लिखाणाची चर्चा वाढत गेली. विविध नामांकित गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक त्यांच्या शब्दांना आवाज देऊ लागले. मास्टर सलीम, सवाई भट, वैशाली सामंत, कविता राम, रेशमा सोनवणे, राणा खुडे यांसारख्या कलाकारांनी त्यांच्या गीतांना स्वर दिले. टी-सीरिज, झी म्युझिक यांसारख्या मोठ्या संगीत संस्थांसोबतही त्यांनी काम केले.
फक्त गीतकार म्हणूनच नव्हे, तर गझलकार म्हणूनही प्रणय सतलज यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. उस्ताद नसीम नागपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गझलचे धडे घेतले आणि दिल्ली, मुंबई, हैदराबाद, रायपूर, कलकत्ता अशा अनेक शहरांतील मुशायरांमध्ये आपल्या शब्दांची जादू दाखवली.
आज “भीम का संविधान” यांसारख्या गीतांनी तरुणांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे. फैजान ताज यांची अनेक लोकप्रिय गीतेही प्रणय सतलज यांच्या लेखणीतून साकारली आहेत. लवकरच मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी त्यांची नवी गीते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
प्रणय सतलज यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत केंद्र शासनाने त्यांना “राष्ट्र गौरव 2023” पुरस्काराने सन्मानित केले, तर महाराष्ट्र शासनाने “छत्रपती शिवाजी महाराष्ट्र राज्य पुरस्कार 2024” प्रदान केला. पुणे कला विकास संस्थेच्या प्रतिष्ठित “कविरत्न पुरस्कार”सह शेकडो पुरस्कार त्यांच्या नावावर जमा झाले आहेत.
यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचूनही प्रणय सतलज आजही आपल्या आई प्रिती, वडील चरणदास खोब्रागडे, पत्नी भूमिका, गुरु सरवर जानी आणि उस्ताद नसीम नागपुरी यांना आपल्या यशाचे खरे श्रेय देतात. संघर्षातून उभा राहिलेला हा शब्दांचा योद्धा आज लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. महाराष्ट्राच्या मातीतील हा शब्दांचा तारा आगामी काळात आणखी तेजाने झळकणार, यात शंका नाही.




