वर्धा : शहरातील संत तुकाराम वॉर्ड परिसरात अवैध व विषारी दारूच्या विक्रीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या अवैध दारू विक्रीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित दारू विक्रेता खुलेआम दादागिरी करत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दारू पिण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींमुळे महिलांना व मुलींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा दारुड्यांकडून महिलांवर अश्लील टिप्पण्या केल्या जात असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकारामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडले असून पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना या प्रकाराचा मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
याबाबत नागरिकांनी अनेक वेळा पोलिसांकडे तक्रारी केल्या असूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांचा वचक राहिला नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. अखेर संतप्त नागरिकांनी एकत्र येत पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
या निवेदनावर मीना कोरे, विद्या पांडे, मंगला भोयर, रिंकू पांडे, दीपा पांडे, रेखा किनकर, शारदा ठोंबरे, वनिता गावंडे, सोनू वाटकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, संबंधित अवैध दारू विक्रेत्यावर कठोर कारवाई करून परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी तातडीने पावले उचलावीत, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




