गिरड (ता. वर्धा) प्रतिनिधी
अत्यंत हालाखीच्या परिस्थितीवर मात करत गिरड येथील गुरूदेव रत्नाकर सेलोरे यांनी पोलीस भरतीत यश संपादन करून कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
गुरूदेव यांचे आई-वडील रोजमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने शिक्षण घेणेही त्यांच्या दृष्टीने मोठे आव्हान होते. तरीही त्यांनी गिरड येथील पेट्रोल पंपावर काम करत बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी आवश्यक साधने नसल्याने त्यांनी कामासोबतच पोलीस भरतीची तयारी सुरू केली.
जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर गुरूदेव यांनी वर्धा येथे झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. मुलाच्या यशाची बातमी कळताच त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
गुरूदेव यांनी कमी शिक्षणातही समाजसेवा करण्याचा ध्यास घेत पोलीस दलात जाण्याचे स्वप्न पाहिले होते. आज ते स्वप्न पूर्ण झाल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.
या यशाबद्दल गावातील मान्यवरांनी त्यांच्या घरी जाऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गुरूदेव यांच्या यशामुळे गिरड परिसरातील युवकांना प्रेरणा मिळत आहे.




