वर्धा | प्रतिनिधी,महाराष्ट्र दणका
सिंदी-रेल्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी अखेर सकारात्मक हालचाली सुरू झाल्याचे चित्र समोर आले आहे. या संदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबीटकर यांची आमदार रोहित पवार आणि वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेत प्रशासकीय अडथळे दूर करून लवकर निर्णय घेण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सिंदी-रेल्वे परिसरातील नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सिंदी-रेल्वे परिसरात आरोग्य सुविधांचा अभाव गेल्या अनेक वर्षांपासून प्रकर्षाने जाणवत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची मर्यादित क्षमता, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता, तसेच आपत्कालीन सेवांचा अभाव यामुळे रुग्णांना वर्धा किंवा नागपूर येथे जावे लागते. यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढत असून अनेक वेळा रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे या केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर व्हावे, ही मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे.
या मागणीला राजकीय पातळीवरही जोरदार पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आमदार जयंत पाटील आणि प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यांनी सिंदी-रेल्वे परिसरातील आरोग्य सुविधांची बिकट परिस्थिती अधोरेखित करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सिंदी-रेल्वे येथे पार पडलेले ‘रक्ताने पत्र’ आंदोलन या संपूर्ण प्रश्नाला वेग देणारे ठरले. अमोल सोनटक्के आणि आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात सुमारे १५०० हून अधिक नागरिकांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले. या आंदोलनाने राज्यभरात मोठी चर्चा निर्माण केली आणि शासनालाही या प्रश्नाची गंभीर दखल घ्यावी लागली.
या आंदोलनानंतर आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनीही सभागृहात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर आता आरोग्य मंत्री प्रकाश आंबीटकर यांच्याशी झालेल्या बैठकीमुळे या मागणीला अधिक बळ मिळाले आहे.
आमदार रोहित पवार आणि जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी या बैठकीत सिंदी-रेल्वे परिसरातील नागरिकांच्या अडचणी ठामपणे मांडल्या. ग्रामीण रुग्णालयाच्या अभावामुळे होणाऱ्या गैरसोयी, वाढती लोकसंख्या, तसेच परिसरातील अपघात आणि आपत्कालीन परिस्थितींचा विचार करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी प्रदेश सरचिटणीस सुनील राऊत, प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे, अमोल सोनटक्के आणि नगरसेवक आशिष देवतळे यांची उपस्थिती होती.
अतुल वांदिले जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट,वर्धा “गेल्या २५ वर्षांपासून सिंदी-रेल्वे येथे आरोग्य सुविधा अपुऱ्या आहेत. १५०० हून अधिक गावांतील नागरिकांनी रक्ताने पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. हा मुद्दा विधानसभेतही सातत्याने मांडण्यात आला. आता आरोग्य मंत्री प्रकाश आंबीटकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच ठोस निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.”
सिंदी-रेल्वे परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि तत्काळ आरोग्य सेवा मिळावी, यासाठी ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी अत्यावश्यक मानली जात आहे. विशेषतः अपघात, प्रसूती, आणि गंभीर आजारांच्या उपचारांसाठी जवळच सक्षम सुविधा उपलब्ध झाल्यास अनेकांचे जीव वाचू शकतात. त्यामुळे शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
एकूणच, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या मागणीस आता गती मिळाल्याचे दिसत असून, येत्या काळात सिंदी-रेल्वे येथे ग्रामीण रुग्णालय उभारणीबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




