वर्धा : जिल्ह्यातील सिंदी मेघे ग्रामपंचायतीत स्वच्छ भारत मिशन (SBM) अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन योजनेत लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप समोर आला आहे. निकृष्ट दर्जाचे काम करूनही अधिकाऱ्यांना मॅनेज करत तब्बल 44 लाख 15 हजार रुपयांचे बिल मंजूर करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
माहितीनुसार, या योजनेअंतर्गत एकूण 2 कोटी 31 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी 68 लाख 99 हजार रुपयांचे एम.बी. रेकॉर्ड दाखविण्यात आले. त्यावरून 31 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद वर्धाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने 44 लाख 15 हजार रुपयांचे देयक मंजूर केल्याची माहिती आहे.याआधी 11 डिसेंबर 2025 रोजी गटविकास अधिकाऱ्यांनी हे बिल जिल्हा परिषदेकडे पाठविले होते, तर 14 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामपंचायतीने संबंधित प्रस्ताव सादर केला होता.

माहितीनुसार, या योजनेत 64 टक्के रक्कम पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून देण्यात आली, तर उर्वरित 24 लाख 83 हजार रुपये ग्रामपंचायतीने द्यायचे असून ते अद्याप देण्यात आले नसल्याचे सांगितले जाते.दरम्यान, या कामाचे बिल थर्ड पार्टी ऑडिट अहवालाच्या आधारे मंजूर करण्यात आल्याचे सांगितले जात असून, हे ऑडिट ‘मूडी इंटरनॅशनल’ या संस्थेमार्फत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र प्रत्यक्षात काम निकृष्ट दर्जाचे असून संपूर्ण अहवाल आणि कागदपत्रे कागदावरच मॅनेज केल्याचा आरोप होत आहे.या कामासाठी 21 मार्च 2023 रोजी ग्रामपंचायतीने निविदा प्रक्रिया (टेंडर) काढली होती.
या प्रकरणात संबंधित कंत्राटदार मोहम्मद फिरोज मोहम्मद हनीफ शेख यांची सखोल चौकशी करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

विशेष म्हणजे, 2021 पासून जिल्ह्यातील 521 ग्रामपंचायतींमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन योजना राबविण्यात आली होती. मात्र सिंदी मेघे येथील कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे.
क्रमश… लवकरच




