Friday, April 17, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाला नाव देण्याची मागणी; स्वाक्षरीची प्रतिकृती बसविण्यासाठी नगरपालिकेला निवेदन

वर्धा, दि. ९ मार्च :

वर्धा शहरातील सिव्हील लाईन परिसरात असलेल्या चौदारतळे प्रतिकृतीच्या समोर संविधान निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षरीची प्रतिकृती ऍक्रेलिक स्वरूपात तयार करून बसविण्यात यावी तसेच येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाला अधिकृतपणे “संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक” असे नाव देण्यात यावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वर्धा शहर (सन २०२६–२७) तर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वर्धा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ व मुख्याधिकारी विजय देशमुख यांना निवेदन सादर केले.

स्वाक्षरीची प्रतिकृती बसविण्यासाठी नगरपालिकेला निवेदन
स्वाक्षरीची प्रतिकृती बसविण्यासाठी नगरपालिकेला निवेदन

समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महामानव, विश्वरत्न व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी वर्धा शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात भीम जयंती महोत्सव साजरा केला जातो. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील चौदारतळे प्रतिकृती परिसर अधिक आकर्षक व ऐतिहासिक स्वरूपाचा व्हावा, यासाठी डॉ. आंबेडकर यांच्या स्वाक्षरीची प्रतिकृती ऍक्रेलिक स्वरूपात बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.

समितीच्या मते, चौदारतळे प्रतिकृती परिसर हा सामाजिक व ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठिकाण असून येथे येणाऱ्या नागरिकांना आणि तरुण पिढीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी, हा या मागणीमागील मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर येथील पुतळा चौकाला अधिकृतपणे “संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक” असे नाव देण्यात आल्यास त्या ठिकाणाला अधिक ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व प्राप्त होईल, असे समितीने निवेदनात नमूद केले आहे.

नगराध्यक्ष आणि मुख्यधिकारी यांना शहर जयंती समितीचे निवेदन

या निवेदनावेळी समितीचे अध्यक्ष राजेश खडसे, महासचिव शारदाताई झामरे, कोषाध्यक्ष उमाताई इंगोले, मुख्य संयोजक विशाल रामटेके, प्रसिद्धी प्रमुख महेंद्र मुनेश्वर, उपाध्यक्ष आशिष मेश्राम, प्रशांत भगत, सचिव राजेश फुलमाळी, ताराचंद भगत, अंकुश मुंजेवार, संयोजक दिनेश थूल, पराग धवन, अमित नाईक, प्रवीण गेडाम, राजीव वानखेडे यांच्यासह सल्लागार दिनेश सवाई, आर. एम. पाटील, डॉ. रवीदत्त कांबळे, ॲड. विजय आगलावे, ॲड. प्रेम ताकसांडे, रवी जगताप, नीरज गुजर, प्रकाश पाटील, अरविंद निकोसे, अजय मेहरा, धम्मपाल शंभरकर, मोहन राईकवार, अतुल दिवे, वसंत भगत, किशोर खैरकर, विशाल मानकर, प्रमोद पाणबुडे तसेच सदस्य ॲड. नीलिमा ताकसांडे, रंजनाताई ढाले, भावना खडसे, राजू थूल, रमेश निमसडकर, विजय वानखेडे, संजय देशभ्रतार आदी उपस्थित होते.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या भीम जयंती महोत्सवासाठी सर्व समाजबांधवांनी पावतीद्वारे वर्गणी स्वरूपात सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वर्धा शहर तर्फे करण्यात आले आहे. समितीच्या वतीने यंदाचा जयंती महोत्सव अधिक भव्य आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular