Sunday, April 19, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

वारको वर्ल्ड सिटी ले-आऊटमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव; नागरिकांचा प्रशासनाविरोधात संताप

वर्धा, प्रतिनिधी :

सेवाग्राम महिला आश्रम रोड परिसरातील ‘वारको वर्ल्ड सिटी’ या ले-आऊटमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आणि विविध अनियमिततेचे आरोप समोर आल्याने येथील नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वे नं. 47/P मध्ये रिवाइज पद्धतीने 104 प्लॉट्स विकसित करण्यात आले असले तरी आवश्यक सुविधा अद्याप उपलब्ध नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कॉलनीमध्ये सांडपाण्याच्या योग्य निचऱ्यासाठी आऊटलेटच उपलब्ध नाही. त्यामुळे सेप्टिक टँकमधील सांडपाणी थेट ड्रेनेजमध्ये सोडले जात असून परिसरात अस्वच्छता वाढली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तसेच, कचरा संकलनासाठी गाडी येत नसल्याने परिसरात घाण साचत आहे. कॉलनीचे प्रवेशद्वार अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे ये-जा करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात ड्रेनेज समस्येमुळे परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

अंडरग्राउंड वीजवाहिन्या व पाइपलाइनचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. गार्डन, चेंबर आउटलेट यांसारख्या सुविधा केवळ कागदावरच असल्याचा दावा करण्यात येत आहे. 2016 मध्ये NA-TP मंजुरी मिळाल्यानंतरही विकासकामे अपुरीच राहिल्याचे समोर आले आहे. या प्रकल्पात कंत्राटदार म्हणून सचिन सिंघानिया यांचे नाव पुढे येत आहे.

याशिवाय, एकीकृत विकास नियंत्रण नियमांनुसार हायवेपासून 37 मीटर अंतर राखणे बंधनकारक असताना प्लॉट क्रमांक 1 वरील 8 मजली इमारत नियमबाह्य असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सदर इमारतीचा नकाशा 17 ऑगस्ट 2023 रोजी SDO व TP कार्यालयामार्फत मंजूर करण्यात आल्याचे सांगितले जात असून ही मंजुरी तात्काळ रद्द करण्याची मागणी होत आहे.

ही वसाहत ग्रामपंचायत चितोडा यांच्या अखत्यारित येत असून, ड्रेनेज समस्येबाबत वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. उलट सांडपाणी हायवेच्या दिशेने वळवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, बाधित नागरिकांनी जिल्हाधिकारी, वर्धा यांच्याकडे अनेकदा तक्रारी दाखल केल्या असून प्रशासनाने घटनास्थळी भेटी दिल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

जर तात्काळ उपाययोजना करून सदर ले-आऊट रद्द करण्यात आला नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular