Friday, April 17, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

आनंदवनातील अपंग काष्ठशिल्पकार गोविंदराव खोडपे यांची जिद्द ठरते प्रेरणादायी

हिंगणघाट (प्रतिनिधी) – बाबा आमटे यांनी उभारलेल्या आनंदवन या सेवाधामात आजही जिद्द, आत्मविश्वास आणि कर्तृत्वाची अनेक उदाहरणे घडताना दिसतात. त्यापैकीच एक म्हणजे काष्ठशिल्पकार गोविंदराव काशीनाथ खोडपे (वय ६०) यांची प्रेरणादायी कहाणी.

कुष्ठरोगामुळे समाजाने दूर सारलेल्या गोविंदरावांना लहान वयातच आनंदवनाने आश्रय दिला. अवघ्या १२व्या वर्षी ते आनंदवनात दाखल झाले. योग्य उपचारांनंतर ते पूर्णपणे रोगमुक्त झाले, मात्र आजारामुळे त्यांच्या हाताची बोटे गळाली. तरीही त्यांनी हार न मानता आपल्या जिद्दीच्या जोरावर काष्ठशिल्प कलेत प्रावीण्य मिळवले.

गोविंदराव यांनी नुकतेच एक अनोखे काष्ठशिल्प साकारले आहे. कोणत्याही आधाराशिवाय किंवा चुंबकाचा वापर न करता एका पायाच्या टाचेवर उभे राहणारे हे शिल्प त्यांच्या कल्पकतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या कलाकृतीतून “जिद्द आणि चिकाटी असेल तर अपंग व्यक्तीही समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करू शकते” असा संदेश ते देतात.

आनंदवनात गेली पन्नास वर्षे राहून त्यांनी विविध काष्ठशिल्पे साकारली आहेत. काचेच्या बाटलीत केलेले सूक्ष्म कोरीव काम, गणपती मूर्ती, अखंड साखळी यांसारख्या कलाकृती त्यांच्या कौशल्याची साक्ष देतात. विशेष म्हणजे, या कामासाठी लागणारी अवजारेही त्यांनी स्वतः तयार केली आहेत.

गोविंदराव यांच्या आयुष्यात चंद्रमणी महाराणा यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कामातील एकाग्रता आणि कल्पकता पाहून बाबा आमटे यांनी त्यांना काष्ठशिल्प विभागात संधी दिली. आज ते या विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

ते साधनाताई आमटे आणि आमटे परिवाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. सध्या डॉ. विकास आमटे यांच्या नेतृत्वाखाली आनंदवनाचा प्रवास सुरू असून विविध उपक्रमांमधून अपंग आणि अंध व्यक्तींना आत्मनिर्भर बनवले जात आहे.

“मी माझ्या कलाकृती आनंदवन परिवारासाठीच घडवतो. पूर्वी बाबा आणि साधनाताईंसाठी काम करत होतो, आता विकासभाऊंसाठी काम करतो, यातच माझा खरा आनंद आहे,” असे गोविंदराव सांगतात.

सुदृढ असूनही जीवनात जिद्द हरवणाऱ्यांसाठी गोविंदराव खोडपे यांचे जीवन खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरत आहे. आनंदवनाला भेट देताना त्यांच्या काष्ठशिल्प विभागाला अवश्य भेट देऊन त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular