वर्धा | प्रतिनिधी, महाराष्ट्र दणका
हिंगणघाट तालुक्यातील सावंगी (रिठ) घाट परिसरात अवैध रेती उपशामुळे निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. वना नदी आणि वर्धा नदीच्या पात्रात पोकलंड मशीन तसेच बोटींच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर रेती उपसा सुरू असून, त्यामुळे नदीपात्राचे विद्रूपीकरण होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, घाट परिसरात जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून नदीचा नैसर्गिक प्रवाह बाधित होत आहे. या खड्ड्यांमुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. तसेच जलचर आणि नदीकाठच्या परिसंस्थेलाही मोठा फटका बसत असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, हा अवैध उपसा प्रामुख्याने रात्रीच्या वेळी सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. रॉयल्टी न भरता मोठ्या प्रमाणावर रेती काढली जात असल्याचे आरोप होत आहेत. यामुळे शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसत असल्याची चर्चा आहे.
स्थानिक पातळीवर काही घाटांवर लाखो रुपयांच्या व्यवहारातून हा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. एका घाटासाठी सुमारे ७ लाख रुपयांचा व्यवहार महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून, यामध्ये काही अधिकाऱ्यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्या मूक संमतीशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध उपसा शक्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. “अवैध रेती उपसा जोमात सुरू असताना प्रशासन कोमात का?” असा सवाल पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून विचारला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांचा या अवैध उपशामध्ये सहभाग असल्याची चर्चा रंगत असल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ प्रशासन आणि जिल्हाधिकारी स्तरावर सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा पर्यावरणीय हानी भविष्यात गंभीर स्वरूप धारण करू शकते, असा इशारा जाणकारांकडून देण्यात येत आहे.




