Friday, April 17, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

मेरिटोरियस शाळेत विद्यार्थिनीवर मारहाण प्रकरण; व्यवस्थापनावर झाकण्याचा आरोप

गोंदिया (प्रतिनिधी) – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील केंद्रीय मान्यताप्राप्त मेरिटोरियस पब्लिक स्कूलमध्ये एका ९ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकांकडून झालेल्या कथित मारहाणीचा प्रकार उघडकीस आला असून, शाळा व्यवस्थापनाकडून हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिरोडा शहरातील लोधी टोला रोडवरील या शाळेत शारीरिक व कला शिक्षकांकडून विद्यार्थिनीला सलग दोन दिवस मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकारामुळे घाबरलेल्या पालकांनी प्रथम मुलीला दवाखान्यात नेऊन उपचार केले. त्यानंतर त्यांनी शाळेचे प्राचार्य प्रफुल्ल तिवारी यांची भेट घेऊन तक्रार मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी भेटण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते.

यानंतर पालकांनी शिक्षण विभाग व महिला व बाल कल्याण विभागाकडे धाव घेतली. प्रशासनाकडून दखल घेतल्यानंतर प्राचार्यांनी पालकांना बोलावून घेतले, मात्र संबंधित शिक्षक संकेत मोहळ व रत्नाकर लांजेवार यांची कोणतीही चूक नसल्याचे सांगत तक्रार फेटाळून लावल्याचा आरोप आहे.

 

पालकांनी सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची मागणी केली असता, प्राचार्यांनी ते दाखवण्यास नकार दिला. पुढे प्रशासनाच्या दबावानंतर संबंधित शिक्षकांना पालकांची माफी मागण्यास सांगण्यात आल्याचे समजते. तरीही घटनेचे स्पष्ट पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत.

दरम्यान, संस्थापक मुकेश अग्रवाल यांनीही शाळेत असा प्रकार घडलेलाच नसल्याचे सांगत पालकांचे आरोप नाकारले. तसेच प्रशासनावर आपला प्रभाव असल्याच्या भावनेतून पालकांना दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

 

या प्रकरणी पालकांनी संबंधित पुरावे सादर करत योग्य चौकशीची मागणी केली असून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या या घटनेची चौकशी सुरू असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular